Sunday, 24 July 2011

गोतावळा

गोतावळा

समोरच्या आजी एक एक धागा पिशवीतून काढत होत्या व गुंडीला गुंडाळत होत्या. बघता बघता त्या धाग्यांचा चेंडू होत होता.न राहवून मी विचारले - कसले हो हे धागे?

त्या म्हणाल्या 'अवो, आमी जितं कामाला जातो तितं  हा गोण्याना बांधलेला असतो , तो आमी  खेचून घेतो बगा . प्रत्येक धागा एक मीटरचा असतो.'
'जरा वोढून  बगा  की  , तुटतोय का तुमच्या हाताने' आजी खिदळत होत्या.आणि खरंच की हो. धागा अगदी मजबूत. 'घरच्या शिवनाला  कामी येतो. गोधड्या तर फारच छान शिवल्या जातात बगा ' आजी सांगत होत्या.

'अहो मुंबईत गोधड्या वापरतंय कोण?' - माझे शहरी मन बोलले. 'अवो आमचा गोतावळा लई मोट्टा बगा. गावाला  मुलींना गोधड्या पाठवते'
'नातवंड उबेत छान झोपतात. तेव्हडीच आजीची माया.नाहीतर म्या म्हातारीला पैसे काही पाठवणं  जमत न्हाई बगा '

आजीबाई बोलून गेल्या आणि मी मात्र विचारांचे जाळे विणु लागले. खरंच निसर्गाने प्रत्येकाला जे हृदय आणि माया दिली आहे त्यामुळे सहजच निसर्गाचे केवढे मोठे काम होते. दूर राहणाऱ्या आपल्या नातवंडाना मायेची पाखर या प्रेमापोटीच, नाही का? बाहेर जोरजोरात पाउस पडत होता व अश्या मंतरलेल्या वेळी सगळं विसरून पावसात मनसोक्त भिजावेसे वाटत होते. न राहवून मी खिडकी उघडली व वाऱ्याच्या झुळूकीबरोबर पाउस ही आत आला. मस्त कॉफि  बनवून मी निसर्गाचा विचार करत होते.

कॉलेजात पहिल्याच वर्षी शिकलेला economics  चा धडा आठवला 'Man is a social being' निसर्गाने माणसाला घडवले ते असे. त्यामुळे उपजतच तो गोतावळ्यात रमू लागला. कधी नात्यांचा गुंता झालाच तर तो सोडवू लागला नाहीतर वेगळी चूल मांडून वेगळा डाव खेळू लागला. परंतु सतत  गुंतत राहिला- कधी कामात, कधी संसारात , तर कधी परमार्थात. सुख दुखांच्या लाटांवरती  हिंदोळे खात खात 'याला  जीवन ऐसे नाव 'म्हणत माणसे जगत असतात व मरत असतात.काहींना कर्तुत्वाचा ध्वज उंचावायला मिळतो, काही श्रीमंत होतात , तर काही गरीबच राहतात. 'असे का' याचे उत्तर मिळाले नाही की जे आहे त्यात समाधान तरी मानायचे किंवा कर्म भोग  म्हणून जे संचित आहे त्यास सामोरे जायचे.

'एक धागा सुखाचा, शंभर धागे दुखाचे
करी जरतारी वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे'

जर अक्खेच वस्त्र जरतारी असते तर सतत टोचले असते व जीवन असह्य झाले असते.म्हणून तर ऐश्वर्यात लोळत असूनसुद्धा सुख हे वाकुल्याच दाखवते. अगदी मजेत पिक्चर पहात असताना एवढासा किडा जरी त्या अंधारात चावला तर सारे सुख हिरावून जाते व आपण त्या चावलेल्या भागाच्याच विचारात रहातो.

परंतु हे सगळे होत असताना , ऋतू चक्रे फिरत राहतात, निसर्गाची अव्याहत प्रगती चालूच राहते. जगातील प्रत्येक जीवित गोष्टीला कामाला लाऊन - झाडे, प्राणी, माणसे - सगळ्यांना कामाला  लाऊन निसर्गाने आपले काम करवून घ्यायची  एक छान शक्कल लढवली - आपल्या  बाळांची माया .मग त्या माये पोटी  कितीतरी जगत्पासारा सहज वाढीस लागतो. व दुसरी गोष्ट म्हणजे माणसाला निसर्गाने सगळे दिले परंतु समाधान दिले नाही. मनुष्याकर्वीच नानाविध शोध लाऊन evolution चालूच राहते . आजचीच बातमी बघाना - खगोल अभ्यासकांना ब्रह्मांडातील  सर्वात मोठ्ठा जलाशय सापडला आहे .

ही जी धडपड करण्याची प्रवृत्ती आहे , ध्यास आहे त्यातच प्रगती आहे. आला दिवस गेला दिवस - यात कसली आली आहे मजा?
अर्रेच्या मीच किती बघता बघता विचारांचा गुंता केला बघा  व त्यात कधी आपण सगळे गुरफटले गेलो कळलेच नाही.शेवटी म्हणतात न -  कालाय तस्मै नमः.

अनघा हुन्नुरकर
२५/०७/२०११

No comments:

Post a Comment

Value your comments.Helps to hone my skills

thanks

anagha