Sunday, 24 April 2011

माझी आई - मंदाकिनी गोगटे

आईचा विचार आला कि डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो फोटो ज्यात आई, बाबा आणि  मी, असे  आहोत. आईच्या त्या लांबसडक दोन वेण्या, चेहऱ्यावरील बुजरेपणा - एक पूर्ण व अश्राप चित्र. मी तेव्हा फक्त एकच वर्षाची होते पण तो फोटो अजूनही डोळ्यासमोर ताजा उभा रहातो.
आई विषयी लिहायचे म्हणजे कुठून सुरू करायचे?
 
पहिल्या श्वासाची साक्षी असते ती माउली. मागे वळून पाहताना अंत:चक्षु समोरून अशी काही चित्रे झरझर जातात कि आठवणींच्या त्या जाळ्यात काय उचलू नि काय  नको - नुसती त्रेधातिर्पित , क्षणात हसू,  क्षणात अनावर अश्रू .
 
आमची आई लौकिक दृष्ट्या  लेखिका व संपादिका होती पण अनेकांना  माहीतही नसेल कि ती उत्तम चित्रे रेखाटायची. शिवणकाम , भरतकाम, स्वयंपाक काहीही असो - तिला विलक्षण आवड. त्याकाळी ती इतके सुंदर फ्रॉक्स शिवायची कि मला टेलर पेक्षा तिच्या हातचेच कपडे आवडायचे. थोडे शिवून झाले कि ती  अंगाला लाऊन अंदाज घ्यायची आणि तेव्हा जर मला काही नवीन fashion सुचली तर लगेच ती बदल करायची व असे कपडे घालताना मला खूपच आनंद व्हायचा. पुन्हा भरपूर कपडे घालायला मिळायचे ते वेगळेच. प्रत्येक वेळेला नवीन fashion आणि भरपूर फ्रॉक्स. World   of   bliss! माझ्या लेकीच्या बारशाच्या वेळी सुद्धा केवढा मोठा बाळंत विडा -दुपटी, झबली, टोपरी, स्वेटर, मोजे - अगदी भरपूर रेलचेल.
 
तीन वाढत्या मुलींच्या आवडी निवडी सांभाळून वर आमचा अभ्यास घ्यायचा , संस्कारांची शिदोरी बांधायची व याउपर लेखन आणि दिवाळी अंकाचे संपादन करायचे. ते सुद्धा कुठलाही पूर्वानुभव वा प्रशिक्षण नसताना. 'बागेश्री' हा दिवाळी अंक दर्जेदार मानला जाई.
 
मला वाटतं माझ्या आईकडे जादू होती. ती जे काही करायची ते उत्तमच असायचं.मग तो दही वडा असो, पुरणपोळी असो कि portrait असो.  सगळं कसं परिपूर्ण. हळदी कुंकू, डोहाळ जेवण, केळवण - काहीही असो सगळी तयारी उत्साहात.
 
माझी आई लेखिका कशी झाली ही कहाणी मनोरंजक तर आहेच पण त्यापेक्षा माणसाला जिद्द असेल तर काहीही असाध्य नाही - या वाक्याचे सार आहे. जेव्हा आई matric झाली तेव्हा आजोबा रिटायर  झाले होते.  तो काळ असा होता कि परिस्थिती नसेल तर मुलींना फार शिकवत नसत. पेन्शनीत गेल्यावर तर अजूनच बिकट अवस्था. परीक्षेचा निकाल लागला तेव्हा माझी आई बेलापूरला मावशीच्या बाळंतपणाला गेली होती. परत येईस्तोवर कॉलेजेस  सुरु झाली होती. माझ्या आईचा शाळेत दुसरा नंबर आला होता पण उशीर झाला होता. त्यात आजोबांनी परिस्थिती नसल्याचे सांगितले. त्याकाळी फ्रीशिप घेतली तर कमीपणा मानला जाई. आता काय करणार? पण ती मंदाकिनी होती. तिने drawing teacher चा कोर्स केला व नोकरी करून बी. ए. साठी प्रवेश मिळवला. बी. ए. च्या शेवटच्या वर्षात असतानाच गोगटे घराण्यात लग्न ठरले व लग्नानंतर  जेमतेम साडे नऊ महिन्यात मी झाले. तरीही आईने बी. ए. ची परीक्षा दिली व अव्वल दर्जात पास झाली.
 
गोगटे घराणे मोठे. त्यामुळे नोकरी करण्याचा प्रश्नच नाही. आता काय करणार? पण मी म्हटले ना की ती मंदाकिनी गोगटे होती. हार मानणार?  छट ! मग घरच्याघरी पुस्तकं वाचणे , मासिके वाचणे सुरु झाले. ( तेव्हा टी.व्ही. नव्हता बरं का )  वाचन करता करता तिला वाटले आपणही लिहावे. माझ्या बाबांना (कै. क. ना. गोगटे ) साहित्याची फारशी जाण नसली तरी आईला त्यांनी प्रोत्साहन दिले. काही कथा लिहिल्या त्या साभार परत आल्या. पण प्रयत्नांना यश हे असतेच. एके दिवशी गोड बातमी आलीच. दिनकर साक्रीकर कथा स्पर्धेत तिला दुसरे बक्षीस मिळाले. तिथूनच आईची भरारी म्हणा, यात्रा म्हणा वा घोडदौड म्हणा -सुरु झाली. तेव्हापासून अव्याहत लिखाण- लहान मुलांच्या कथा, कविता, वैज्ञानिक कथा, कादंबरी, लघु लेखन, समीक्षा, विनोदी- मिस्कील कथा, प्रवास वर्णन, 'सवत माझी लाडकी' या चित्रपटाची कथा, 'गागी' ही भावस्पर्शी लघु कादंबरी - ओघ चालूच. वाचन आणि लेखनाचा ध्यासच. जरा मोकळा वेळ मिळाला कि लागली लिहायला नाहीतर वाचायला.तिच्या डायरीतल्या टीपा ही इतक्या रंजक आहेत कि अनेक आठवणीना उजाळा मिळतो. 
 
अशी आमची आई - जिद्द , चिकाटीचे धडे असे आम्हाला मिळाले. निराश होऊन आईकडे जावे व मरगळ , नैराश्य झटकून -  नवी उमेद , नवा आनंद घेऊन कामाला लागावे.एक वेळ आम्ही घाबरू पण आई धीट. आपण सगळे पुनर्जन्म मानतो. शेवटी शेवटी जेव्हा आई खूप आजारी होती तेव्हा मी आईला विचारले 'आई , पुढच्या जन्मी तू कोण होणार ?'  ती म्हणाली  'लेखिकाच पण आता इंग्रजीची'
 
आता जेव्हा मी तिच्या जीवन पटलाचा विचार करते , तिची झुंज अनुभवते तेव्हा राहून राहून हेच वाटते कि तिच्यात राणी लक्ष्मीबाई सारख्या लढवय्या स्त्रीचा अंश होता. फरक इतकाच कि क्षेत्र वेगळं होतं.
'खूब लड़ी मर्दानी वो तो झंसिवाली रानी थी '
 
 
सौ अनघा हुन्नुरकर
 
(रेखा गोगटे)
written on 5th Sep 2010

वानवा



'राधे , जायचं बरं का युरोपला' माधवरावांनी हलकेच फोनवरून आपल्या बायकोला सांगितलं. राधाबाई तर हरखूनच गेल्या . एवढ्या वर्षांचे उरी बाळगलेले स्वप्न आज साकारताना बघून त्यांना गगन ठेंगडे झाले होते. माधवरावांचा  काटेकोर स्वभाव.त्यामुळे सफरीची पूर्ण तयारी कशी अगदी आखीव रेखीव. सामान, सामानाची यादी, शोर्बेत टूर्स ची माहिती पत्रिका, सारी तयारी जय्यत.

आणि शेवटी तो दिवस उगवलाच. विमामाने युरोपला गमन. दूसऱ्या दिवशीच अथांग स्विस आल्प्स चे दर्शन झाले. आतापर्यंत फोटोत पाहिलेले ते महाकाय पर्वत असे प्रत्यक्ष पाहून राधाबाईना  काय करू आणि काय नको असे झाले. टूर गाईड, अनिल म्हात्रे सगळ्याना सूचना देत होते . बर्फावर कसे जपून चालायचे याचे प्रात्यक्षिक दाखवल्यावर त्यांनी राधाबाईन्सारख्या बायकांना बर्फावर न जाण्याची सूचना केली. राधेला जरा रागच आला. पर्वतराजी अशा समोर उभ्या ठाकल्या असताना बर्फावर नाही जायचे ? मग एवढ्या लांब काय आपण दुरून  डोंगर साजरे करायला आलो आहोत? राधेचं  षोडशवर्षा मन बोलू लागले . ' मी तर जाणार बुवा ' माधवराव अगं अगं म्हणताहेत तोवर बूट घातलेल्या राधाबाई चढू लागल्या. थंड थंड गारवा ,उत्तुंग पर्वत, त्यावरील हिमाच्छादित उंच विशाल झाडे , सगळं कसं नयनरम्य व मंत्रमुग्ध  करणारं. राधाबाई मजेत एक एक पाऊल उचलत होत्या. काठीची साथ होतीच. काही ठिकाणी मऊ मऊ हिम तर काही ठिकाणी टणक बर्फ. एखादे कोडे लीलया सोडवावे तशी त्या वाट काढत होत्या. त्या क्षणी त्या एकट्या होत्या. त्यांना कोणाचं वा कशाचे भान नव्हते. पर्वतांच्या कुशीत त्या खुशाल खेळत होत्या. जणू त्यांना अहं ब्रह्मास्मिचा साक्षात्कार झाला होता.

अशा आनंदात त्या स्वच्छंदीपणे हळू हळू वर चढत  होत्या.  इतक्यात त्याचं जरा दुर्लक्ष झाले आणि कटकन काठी तुटून त्यांचा तोल गेला. बस तेवढे कारण पुरले आणि राधाबाई अक्षरशः जोरात आपटल्या. गुळगुळीत बर्फावरून त्या सरसर वेगाने खाली खाली घसरतच गेल्या. तोल सांभाळता आला तेव्हा फारच उशीर झाला होता .खरचटले तर होतेच पण त्यांना गुढ्ग्याशी कट्ट असा आवाज ऐकल्याचा भास झाला. आता आली की पंचायत. करुण नजरेने त्यांनी आजूबाजूला पहिले. दुरून त्यांना माधवराव व इतर मंडळी लगबगीने येताना दिसली. काय होतंय हे कळायच्या आतच त्यांना बगलेत पकडून काहींनी गाडीत बसविले. नशिबाने त्या चमूत एक डॉक्टर आणि तेही हाडाचे स्पेशालीस्ट  (ओर्थो) होते. त्यांनी लगेचच तपासणी  केली व त्वरित हॉटेल वर सगळे गेले. डॉक्टर साहेबांनी त्यांच्याकडील गोळ्या दिल्या. खोलीतून बाहेर येताना त्यांनी माधवरावांना व टूर गाईड, अनिल म्हात्रे यांना खुण केली. तिघे ही लॉबीत आले.त्यांचे सहचर गोखले सुद्धा लागलीच त्या तिघांना जॉईन झाले.  डॉक्टर साहेबांनी वस्तुस्थिती समजाऊन सांगितली. राधाबाईन्चे हाड मोडले होते. तात्पुरत्या गोळ्या जरी दिल्या होत्या तरी परदेशात डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन चालण्यासारखे नव्हते. हॉस्पिटलचा खर्च तर अवाढव्य व न परवडणारा. गोळ्यांचा तात्पुरता उपयोग होणार होता पण एकदा का त्यांचा असर उतरला की ठणाणा वेदना होणार हे डॉक्टरांना उमगले होते. सद्य परिस्थितीत भारताला परत जाणेच  क्रमप्राप्त होते.

टूर गाईड, अनिल म्हात्रे म्हणाले की परतीचे तिकीट हे प्रिपोन करता येत नाही.त्यामुळे नवीन तिकीट काढणे हाच पर्याय होता. सफरीचा दुसरा दिवस. कुठून अवदसा आठवली नि बर्फावर खेळायला गेले - राधाबाई मुसमुसून रडत होत्या. माधवरावांना तर आकाशच फाटले असे वाटले. काय करावे? भारतात त्यांचे तीन मुलगे. तिघांनी मिळून जेमतेम या सफरीचे पैसे जमविले. आता परत तिकिटाचे पैसे मागवायचे ? कठीणच - तिघात कोणीही पुढाकार घेणार नाही. आणि माधवरावांना हुंदका आवरेनासा झाला. 'अहो, असे रडताय काय?' - गोखले. गोखल्यांना व डॉक्टरांना लगेचच कळले की मामला  पैशाचा  आहे. गहिवर ओसरल्यावर माधवरावांनी जे सांगितले  त्याने गोखले व डॉक्टर दोघेही गारच पडले. 'अहो आमची कथा बाघबान सारखी आहे. ही असते आमच्या शेंडेफलाकडे  व मी असतो कधी मध्ल्याकडे नाहीतर कधी थोर्ल्याकडे.दोन दोन वर्षं आमची भेट नसते हो. आता परत गेलो तर विमानतळावरच आमची परत ताटातूट.दोनच दिवसाचं सहवास मिळाला.  काही  सुचत नाहीये. तिघांची परिस्थिती माहित असताना परत पैसे मागायचे म्हणजे तर धर्मसंकट '

माधवरावांची ती केविलवाणी स्थिती दोघांनाही बघवेना.त्यांना समजून पाहिले, धीर दिला पण परिस्थिती फारच अवघड होती. आयुष्यभर ताठ मानेने जगणाऱ्या त्या  पितृतुल्य मानवाला अये ढसाढसा रडताना पाहून दोघेही भारावले व भांबावले. मग त्या दोघांनी टूर गाईड, अनिल म्हात्रेला भारतात शोर्बेत टूर्सच्या ऑफिसला फोन  करायला सांगितलं. 'तू प्रयत्न  तर कर. ऑफिस   काहीतरी  मार्ग काढेलच' 'समजा नाहीच काढला तर?' शंकेची पाल मनात चुक्चुक्लीच. एकेक  मिनिट महत्वाचे असताना, तासच्या तास गेले तर मात्र राधाबाईनच्या दुखण्याला पारावर राहणार नाही. फोन लावला. पण उत्तर काहीही असू शकेल  त्यामुळे काहीतरी केलेच पाहिजे. विचार करुण सरते शेवटी गोखल्यांनी ठरविले - माझे वडील असते तर मी काय केले असते? आता काहीही होवो दोघांना मायदेशी पाठ्वायचेच.

तेवढ्यात म्हात्र्याना फोन आला .सगळी सोय झाली होती.शोर्बेत टूर्सच्या ऑफिसने सर्व जबाबदारी उचलली होती. पाणावल्या डोळ्यांनी त्या दोघांनी सगळ्याचं निरोप घेतला व परत मायदेशी प्रयाण केले -  एक अनामिक दुख; पोटाशी बाळगून , जे फक्त डॉक्टर आणि गोखले जाणून होते. राधाबाई निस्तेज डोळ्यांनी सगळं पहात होत्या. 'आता कधी आणि केव्हा एकत्र  भेटू  कुणास ठाऊक ' माधवरावांची पाणावलेली नजर बोलून गेली. राहिला तो फक्त गहिवर.

सौ. अनघा हुन्नुरकर
२४ एप्रिल २०११