Sunday, 19 June 2011

भुर्र

भुर्र

लहानपणी आम्ही एक खेळ खेळायचो. ज्याच्यावर डाव असे तो पक्ष्यांची नवे घेई ...... कावळा, चिमणी, पोपट.......त्याने कावळा म्हटले कि आम्ही सगळे भुर्र म्हणायचं. मग मध्येच तो ससा किंवा सिंह असे म्हणायचा. जर कोणी भुर्र म्हटले तर त्याच्यावर डाव जायचा. काल सहजच या खेळाची आठवण झाली व मनात खुदकन हसले. त्यावेळी आम्ही कधीही 'दिवस' हा शब्द उच्चारला नाही. दिवस म्हटल्यावर भुर्र म्हणायचे कि नाही हा मोठा प्रश्न पडला असता.

तोच डाव जर आज खेळलो तर निर्विवादपणे 'भुर्र' च म्हणावे लागेल. कधी शाळा  कॉलेजचे दिवस सरले, नोकरी लागली, लग्न झले, मुले झाली  .बघता बघता ती मोठी झाली  आणि  काल परवा म्हणता म्हणता प्रकर्षाने जाणवले की त्या ओघात आपणही 'दिवस' भुर्र म्हणायचे सुद्धा विसरून गेलो. ज्या मुलाचा पहिला वाढदिवस आपण बघितला तोच आज डॉक्टर किंवा प्रोफेसर  म्हणून समोर येतो व जीव हबकून जातो. अर्रेच्या , मैथिलीचा मुलगा एवढा मोठ्ठा झाला? विश्वासच बसत नाही. सतत नमस्कार करून आशीर्वाद घेणाऱ्या  आपल्या डोक्यात अचानक प्रकाश पडतो की आता आशीर्वाद देणारी मंडळी खूपच कमी झाली आहेत आणि आपणच आता आशीर्वाद द्यायच्या वळणावर येऊन थबकलो  आहोत.

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,
घेता  घेता एक दिवस घेणाऱ्याने
 देणाऱ्याचे हात घ्यावे

 - या विंदा करंदीकरांच्या ओळी कितीदातरी ऐकल्या बोलल्या असतील पण आता जेव्हा मुले दहावीच्या निकालाचे पेढे घेऊन येतात तेव्हा सहजच आपले दिवस आठवतात व आपण खिशात हाथ घालून त्याला पैसे देऊन भरपूर कौतुक व आशीर्वाद देतो. मन मात्र आपल्या दहावीत रमून गेलेले असते. शाळेतली ती मज्जा मस्ती अनुभवत असते. अवधान येते पण मन रुंजी घालताच असते.

अशा गोजीर्वाण्या दिवसांना कधी कधी वर्तमानाचा चटका सुद्धा लागतो बरं का . शेवटी हा साप शिडीचा किंवा झोक्याचा  खेळच की. कधी वर तर कधी खाली. खाली असलो तर वर जायची धडपड आणि वर असलो तर गालावर खेळणाऱ्या  मंद झुळूकेचा आनंद. असाच एक एक  दिवस आपण जगत असतो , दिवसांची  वर्षे होतात, वर्षांची दशके आणि मग आपण म्हणतो - याला जीवन ऐसे नाव.

पण एका गोष्टीची जाणीव असेल तर सरती वर्षे सुद्धा सुंदर होतात. मन जर सत्तरीत षोडशवर्षा  राहिले तर वर वर वाटते की आपण मनाने तरुण आहोत  व हेच महत्वाचे. परंतु त्या स्थितीत सुद्धा वर्तमानाचे  भान नसेल तर हसेच होते नाहीतर निराशा पदरी पडते. मी मध्ये  एकदा एका ऐशी वर्ष्यांच्या आजी बाईना भेटले होते.त्या शास्त्रीय  संगीताच्या  विशारद  होत्या. त्या वयातही नवीन राग, सूर , ताल व चालींच्या सतत शोधात असायच्या. मला त्यांच्या या उत्साहाचे खूपच आश्चर्य वाटायचे. शेवटी न राहवून मी त्यांना त्याबद्दल विचारले. त्या जे म्हणाल्या त्याने मी अवाकच झाले. त्या म्हणाल्या - अगं हि पैशाची पुंजी वर थोडी घेऊन जाणार? शेवटी संस्कारच आपल्या बरोबर येणार - हि पुढच्या जन्माची तयारी आहे. वेळ अगदी थोडा आहे त्यात जेवढे जमवता येईल तेवढे जमवायचे.

एकीकडे त्या आजीबाई तर  दुसरीकडे बालगंधर्वांचे उदाहरण. आपल्या शिदोरीत किती व कसे जमा करायचे हे ज्याच्या त्याच्या मनावर अवलंबून. आणि म्हणूनच काही म्हणतात :कालाय तस्मै नमः , तर काही त्या काळावरही विजय मिळवतात. 
 
अनघा हुन्नुरकर
 

No comments:

Post a Comment

Value your comments.Helps to hone my skills

thanks

anagha