Sunday, 4 September 2011

शोध

शोध
'अरे मी चष्मा कुठे ठेवला?'

इथे शोध, तिथे शोध. चष्मा  वापरून झाल्यावर अगदी नेटकेपणाने ठेवलेला  चष्मा कधी वेळेला मिळतच नाही. एकदा का तो ब्यागेत गेला की त्या अलीबाबाच्या पोतडीतल्या अनेक कप्प्यातून, कुठल्या कप्प्यात मिळेल  हे काही सांगता येत नाही. भरपूर शोधूनही नाही मिळाला  की आहेच मग इथे बघ अन तिथे बघ.

मग एखादा पोक्त सल्ला 'वेळीच नीट ठेवला की मग असा गोंधळ  होत नाही.'
'अहो, वेळीच नीट ठेवला होता पण आता नाही मिळत आहे 'आधीच चष्मा न मिळाल्यामुळे हैराण झालेले मन अजूनच कावून जाते.


 आपण जर विचार केला तर उमजते  की खरे तर प्रश्न नीट ठेवण्याचा नाहीच आहे.  प्रश्न आहे आठवण्याचा. दिवसभरात आपण इतक्या लहान सहान गोष्टी करत असतो की अनेकदा त्या क्रिया 'reflex action' म्हणून होऊन जातात .त्यामुळे स्मृतीपटलावर त्याची नोंद होत नाही. आणि मग आपण शोधत रहातो -  खरतर आठवत रहातो. माझ्या सासूबाई म्हणायच्या की उजव्या हातानेच नेहमी वस्तू ठेवावी म्हणजे  विसरायला होत नाही.परंतु आपण इतक्या घाईत असतो की वस्तू ठेवताना हे भान राहत नाही.


माझी  एक मैत्रीण, विनोदिनी. तिची नेहमीची सवय की काहीही गोष्ट परत  करताना ती माझ्या हाताला चिमटा काढते. मला तिची ही सवय फार विचित्र वाटायची. पण आता विचार केल्यावर कळते  की तिच्या या सवयीमुळे कुठलीही गोष्ट जाणतेपणीच  होते.  त्यामुळे 'अगं तू माझे डूल परत केलेस का ग? ' असा सवाल कधीच विचारावा लागला नाही.

त्याउलट सविता.तिला कधीही काहीही विचारा.उत्तर एकच - आहे , पण शोधावे लागेल.
तिचा शोध सततच चालू असतो. टापटीप, स्वच्छता याची अंगभूत आवड. तिचे कपाट कधीही उघडावे. व्यवस्थितच असणार. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा व्यवस्थित गुंडाळून, घडी करून पेटीत ठेवणार. पण इतक्या असंख्य गोष्टी की कुठली गोष्ट कुठे ठेवली याचा अचूक विसरच पडणार. बरे यादी बनवावी तर काय काय गोष्टींची यादी बनवणार ? आणि कितीदा बदलत राहणार? कारण खरेदीचा सोस ही दांडगा. दिसली सुंदर गोष्ट , घे विकत.मग ती वस्तू  सध्या तरी वापरण्यासारखी नसते किंवा आणखी काहीतरी  काम करायचे असते. मग तात्पुरती त्याची वर्णी कपाटात.

 अनेकदा शोधून शोधून थकल्यावर आपण शोधायचे सोडून देतो आणि अचानक एके दिवशी विनासायास ती गोष्ट आपल्या हाती लागते तेंव्हा झालेला आनंद हा अवर्णनीय असतो.


 आम्हाला लहानपणी एक धडा होता : चिंगीचे दप्तर. ही चिंगी दिवसभरात जे दिसेल ते गोळा करून दप्तरात ठेवायची. खडू, मोराची पिसे, रबर , पेन्सिली, गोळ्यांचे चांदीचे कागद, नाणी, प्लास्टिकची  फुले, मणी,  बटणे, सागर गोटे, शिंपले, अरीस्पानी तुकडे -  अशा एक ना अनेक अफलातून गोष्टी तिच्या दप्तरात असायच्या  व आम्हाला परीक्षेत प्रश्न असायचा : चिंगीच्या दप्तरात काय आहे? एवढा राग यायचा त्या चिंगीचा . हिचे उद्योग आणि प्रश्न आम्हाला. बरे काही कमी लिहावे तर मार्क कापायला बाईही तयार आणि आईही ओरडायला तयार. नीट पाठ करून का नाही जात. बरं काहीही ठोकावे तरी बाई लाल शाईने अधोरेखित करायच्या. दोन्हीकडून पंचाईत. पण नंतर याच गोष्टीचा पुढे 'मेमरी गेम' खेळताना खूप फायदा झाला.


जसजसे मोठे होत गेलो तस तसे शोधाची व्याख्याही बदलत गेली. कधी नोकरी - तर कधी जीवन साथी. जुन्या पुस्तकांच्या दुकानात किंवा पुस्तकालयात मी कितीतरी वेळ चांगले पुस्तक शोधण्यात किंवा वाचण्यात घालवला आहे. पण या शोधाची मजा काही औरच असते. त्याउलट जावई शोध लावले की हसून हसून पुरेवाट.आता तर इंटरनेट मुळे अगदी पंचवीस वर्षानिसुद्धा  आम्ही शाळेतली मूले एकत्र एका ग्रुप मध्ये  आलो आहोत. बालपण परत परत अनुभवायला तर मिळतेच पण त्याउपर अगदी नि:संकोचाने आपली मते मांडायला एक व्यासपीठ मिळते. Facebook मुळे तर अनेक आप्तज जवळ आले.Google सारख्या 'शोध' engines  मुळे तर आता जगाच्या पाठीवरचेच नाही तर त्याही पलीकडचे सुधा क्षणात कळते. अर्थात अजूनही 'बायकोला सदा आनंदित कसे ठेवावे?' हा प्रश्न Google ला टाकला तर 'अजून शोधात आहे' असे उत्तर मिळाल्याचे ऐकिवात आहे.

 असा शोध करता करता हळू हळू जीवनाची संध्याकाळ कधी होते ते कळतच नाही. आणि मग आणखी एका शोधाची सुरवात होते - आत्मशोध.मला वाटते लोकमान्य टिळकांचे 'गीता रहस्य' किंवा पंडित जवाहरलाल नेहेरूंचे 'भारत -एक खोज' हे ग्रंथसुद्धा   कुठेतरी आत्मशोधाच्या दिशेचे पाऊल होते.सखोल विचार केल्यावर असेही दृष्टीस येते  की आपले अक्खे  जीवनच मुळी एक आत्मशोध असतो. फक्त फरक एवढाच की तरुणपणी कशाची उसंत नसल्यामुळे आपण त्यावर अधिक विचार करत बसत नाही. मागे वळून आपला जीवनपटल  पहिला तर अनेकदा आश्चर्य वाटते की कसे आपण त्यातून गेलो. आता परत ती वेळ आपल्यावर आली तर कदाचित आपण नाही करू शकणार ते दिव्य. परंतु प्रत्येक प्रसंगातून जाताना समाधान असते की आपण त्यावेळी जो प्रयत्न करायचा  होता तो पूर्ण केला.कुठे कमी पडलो नाही किंवा आळस केला नाही.

सतत आनंदी राहणे हे काही शक्य नसते. जीवनाच्या चढ  उतारात हिंदोळे खावेच लागतात. कधी फसले जातो तर कधी अविश्वासाने आपल्याकडे बघितले जाते. काल परवा पर्यंत आपली वाटणारी मंडळी आपल्यावर उलटतात .सीझरलाही शेवटी म्हणावेच लागले ' ब्रुटस यु टू?' पण म्हणून काही जीवनाची शोकांतिका होत नाही. जीवन हे अव्याहत चालूच राहते व आनंदाचा फुलोरा पसरतच रहातो.

अनघा हुन्नुरकर
४/०९/२०११

1 comment:

  1. रेखा
    तू खूप छान लिहितियेस. अगदी सहज आणी सुटसुटीत. एक विनंती आहे. तू कदाचित माझे पोस्त पहिले असशील, येत्या एप्रिल मध्ये, कार्डिफ, यु.के. येथे ९वे युरोपीय मराठी संमेलन आहे. ह्या संमेलनाचा मी अध्यक्ष आहे. ह्या संमेलनाचा दर वेळेस एक अंक प्रकाशित होतो. ह्या खेपेस अंकाचे नाव आहे "अनुबंध". अंकाचे संपादन माझी मैत्रीण अस्मिता पटवर्धन करतीये. माझी विनंती अशी की तू एक लेख ह्या अंक साठी लिहावास. बाकी क्षेम. नक्की कळव.

    निनाद
    ninad.thackare@gmail.com
    www.ems2012wales.org.uk

    ReplyDelete

Value your comments.Helps to hone my skills

thanks

anagha