'राधे , जायचं बरं का युरोपला' माधवरावांनी हलकेच फोनवरून आपल्या बायकोला सांगितलं. राधाबाई तर हरखूनच गेल्या . एवढ्या वर्षांचे उरी बाळगलेले स्वप्न आज साकारताना बघून त्यांना गगन ठेंगडे झाले होते. माधवरावांचा काटेकोर स्वभाव.त्यामुळे सफरीची पूर्ण तयारी कशी अगदी आखीव रेखीव. सामान, सामानाची यादी, शोर्बेत टूर्स ची माहिती पत्रिका, सारी तयारी जय्यत.
आणि शेवटी तो दिवस उगवलाच. विमामाने युरोपला गमन. दूसऱ्या दिवशीच अथांग स्विस आल्प्स चे दर्शन झाले. आतापर्यंत फोटोत पाहिलेले ते महाकाय पर्वत असे प्रत्यक्ष पाहून राधाबाईना काय करू आणि काय नको असे झाले. टूर गाईड, अनिल म्हात्रे सगळ्याना सूचना देत होते . बर्फावर कसे जपून चालायचे याचे प्रात्यक्षिक दाखवल्यावर त्यांनी राधाबाईन्सारख्या बायकांना बर्फावर न जाण्याची सूचना केली. राधेला जरा रागच आला. पर्वतराजी अशा समोर उभ्या ठाकल्या असताना बर्फावर नाही जायचे ? मग एवढ्या लांब काय आपण दुरून डोंगर साजरे करायला आलो आहोत? राधेचं षोडशवर्षा मन बोलू लागले . ' मी तर जाणार बुवा ' माधवराव अगं अगं म्हणताहेत तोवर बूट घातलेल्या राधाबाई चढू लागल्या. थंड थंड गारवा ,उत्तुंग पर्वत, त्यावरील हिमाच्छादित उंच विशाल झाडे , सगळं कसं नयनरम्य व मंत्रमुग्ध करणारं. राधाबाई मजेत एक एक पाऊल उचलत होत्या. काठीची साथ होतीच. काही ठिकाणी मऊ मऊ हिम तर काही ठिकाणी टणक बर्फ. एखादे कोडे लीलया सोडवावे तशी त्या वाट काढत होत्या. त्या क्षणी त्या एकट्या होत्या. त्यांना कोणाचं वा कशाचे भान नव्हते. पर्वतांच्या कुशीत त्या खुशाल खेळत होत्या. जणू त्यांना अहं ब्रह्मास्मिचा साक्षात्कार झाला होता.
अशा आनंदात त्या स्वच्छंदीपणे हळू हळू वर चढत होत्या. इतक्यात त्याचं जरा दुर्लक्ष झाले आणि कटकन काठी तुटून त्यांचा तोल गेला. बस तेवढे कारण पुरले आणि राधाबाई अक्षरशः जोरात आपटल्या. गुळगुळीत बर्फावरून त्या सरसर वेगाने खाली खाली घसरतच गेल्या. तोल सांभाळता आला तेव्हा फारच उशीर झाला होता .खरचटले तर होतेच पण त्यांना गुढ्ग्याशी कट्ट असा आवाज ऐकल्याचा भास झाला. आता आली की पंचायत. करुण नजरेने त्यांनी आजूबाजूला पहिले. दुरून त्यांना माधवराव व इतर मंडळी लगबगीने येताना दिसली. काय होतंय हे कळायच्या आतच त्यांना बगलेत पकडून काहींनी गाडीत बसविले. नशिबाने त्या चमूत एक डॉक्टर आणि तेही हाडाचे स्पेशालीस्ट (ओर्थो) होते. त्यांनी लगेचच तपासणी केली व त्वरित हॉटेल वर सगळे गेले. डॉक्टर साहेबांनी त्यांच्याकडील गोळ्या दिल्या. खोलीतून बाहेर येताना त्यांनी माधवरावांना व टूर गाईड, अनिल म्हात्रे यांना खुण केली. तिघे ही लॉबीत आले.त्यांचे सहचर गोखले सुद्धा लागलीच त्या तिघांना जॉईन झाले. डॉक्टर साहेबांनी वस्तुस्थिती समजाऊन सांगितली. राधाबाईन्चे हाड मोडले होते. तात्पुरत्या गोळ्या जरी दिल्या होत्या तरी परदेशात डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन चालण्यासारखे नव्हते. हॉस्पिटलचा खर्च तर अवाढव्य व न परवडणारा. गोळ्यांचा तात्पुरता उपयोग होणार होता पण एकदा का त्यांचा असर उतरला की ठणाणा वेदना होणार हे डॉक्टरांना उमगले होते. सद्य परिस्थितीत भारताला परत जाणेच क्रमप्राप्त होते.
टूर गाईड, अनिल म्हात्रे म्हणाले की परतीचे तिकीट हे प्रिपोन करता येत नाही.त्यामुळे नवीन तिकीट काढणे हाच पर्याय होता. सफरीचा दुसरा दिवस. कुठून अवदसा आठवली नि बर्फावर खेळायला गेले - राधाबाई मुसमुसून रडत होत्या. माधवरावांना तर आकाशच फाटले असे वाटले. काय करावे? भारतात त्यांचे तीन मुलगे. तिघांनी मिळून जेमतेम या सफरीचे पैसे जमविले. आता परत तिकिटाचे पैसे मागवायचे ? कठीणच - तिघात कोणीही पुढाकार घेणार नाही. आणि माधवरावांना हुंदका आवरेनासा झाला. 'अहो, असे रडताय काय?' - गोखले. गोखल्यांना व डॉक्टरांना लगेचच कळले की मामला पैशाचा आहे. गहिवर ओसरल्यावर माधवरावांनी जे सांगितले त्याने गोखले व डॉक्टर दोघेही गारच पडले. 'अहो आमची कथा बाघबान सारखी आहे. ही असते आमच्या शेंडेफलाकडे व मी असतो कधी मध्ल्याकडे नाहीतर कधी थोर्ल्याकडे.दोन दोन वर्षं आमची भेट नसते हो. आता परत गेलो तर विमानतळावरच आमची परत ताटातूट.दोनच दिवसाचं सहवास मिळाला. काही सुचत नाहीये. तिघांची परिस्थिती माहित असताना परत पैसे मागायचे म्हणजे तर धर्मसंकट '
माधवरावांची ती केविलवाणी स्थिती दोघांनाही बघवेना.त्यांना समजून पाहिले, धीर दिला पण परिस्थिती फारच अवघड होती. आयुष्यभर ताठ मानेने जगणाऱ्या त्या पितृतुल्य मानवाला अये ढसाढसा रडताना पाहून दोघेही भारावले व भांबावले. मग त्या दोघांनी टूर गाईड, अनिल म्हात्रेला भारतात शोर्बेत टूर्सच्या ऑफिसला फोन करायला सांगितलं. 'तू प्रयत्न तर कर. ऑफिस काहीतरी मार्ग काढेलच' 'समजा नाहीच काढला तर?' शंकेची पाल मनात चुक्चुक्लीच. एकेक मिनिट महत्वाचे असताना, तासच्या तास गेले तर मात्र राधाबाईनच्या दुखण्याला पारावर राहणार नाही. फोन लावला. पण उत्तर काहीही असू शकेल त्यामुळे काहीतरी केलेच पाहिजे. विचार करुण सरते शेवटी गोखल्यांनी ठरविले - माझे वडील असते तर मी काय केले असते? आता काहीही होवो दोघांना मायदेशी पाठ्वायचेच.
तेवढ्यात म्हात्र्याना फोन आला .सगळी सोय झाली होती.शोर्बेत टूर्सच्या ऑफिसने सर्व जबाबदारी उचलली होती. पाणावल्या डोळ्यांनी त्या दोघांनी सगळ्याचं निरोप घेतला व परत मायदेशी प्रयाण केले - एक अनामिक दुख; पोटाशी बाळगून , जे फक्त डॉक्टर आणि गोखले जाणून होते. राधाबाई निस्तेज डोळ्यांनी सगळं पहात होत्या. 'आता कधी आणि केव्हा एकत्र भेटू कुणास ठाऊक ' माधवरावांची पाणावलेली नजर बोलून गेली. राहिला तो फक्त गहिवर.
सौ. अनघा हुन्नुरकर
२४ एप्रिल २०११
No comments:
Post a Comment
Value your comments.Helps to hone my skills
thanks
anagha